●समाज शिक्षक गाडगेबाबा●
महाराष्ट्राच्या पावन भूमीत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, गोरा कुंभार, सावता माळी, तुकडोजी महाराज असे अनेक महान संत होऊन गेलेत. ह्या मांदियाळीत विदर्भातील कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला या महात्म्याने प्रकाशाची वाट दाखवली. आपल्या कीर्तनातून भोळ्या-भाबड्या जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
डेबूजी झिंगराजी जाणोरकर हा तसा अगदी सामान्य माणूस. धोबी समाजातील काबाडकष्टाचे जीणे त्याने अनुभवले. माय सखूबाई, बाप झिंगराजी आणि अवतीभवतीच्या लोकांच्या जगण्यातील भयाण वास्तव त्याच्या मनात सलू लागले. प्रपंचात त्याचे मन रमले नाही. लेकराबाळात त्याचा जीव अडकला नाही. 'लोकांची सेवा, गोरगरीबांची, दीनदलितांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा' हा साधासरळ सिद्धांत त्याला उमगला आणि डेबूजीचा गाडगेबाबा झाला. माय, बायको, लेकरं, सगेसोयरे, गावकरी ह्या सर्वांना सोडून गाडगेबाबा लोकांची सेवा करण्यासाठी निघाले.अंगावर फाटके-तुटके रंगीबेरंगी कपडे, डोक्यावर खापर, हातात खराटा असा वेष करून गाडगेबाबांनी आपली भटकंती सुरू केली. तुकोबाचे अभंग, कबीराचे दोहे आणि आपल्या जगण्यातून हाती आलेले सत्य हेच आपले धन मानून ह्या फकिरासारखे जीणे जगलेल्या माणसाने आपले अख्खे आयुष्य जनता जनार्दनासाठी समर्पित केले. खराटा हातात घेऊन गावे स्वच्छ केलीत. देणग्या गोळा करून धर्मशाळा बांधल्या.कीर्तनातून माणसातला माणूस जागा केला. तहानलेल्याला घोटभर पाणी आणि भुकेल्याला चतकोर भाकर देता येण्याइतकी मनाची श्रीमंती मराठी माणसाला गाडगेबाबांनी दिली.
लौकिक अर्थाने शाळा शिकलेले नसले तरी गाडगेबाबा हे एक चालते बोलते विद्यापीठच होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी मांडलेले विचार थक्क करून सोडणारे आहेत. त्यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान पिढ्यान् पिढ्या उपेक्षित जीवन जगलेल्या समाजाला उत्थानाचा मार्ग दाखवणारे आहे. देवाधर्माच्या नावावर चाललेल्या फसवणुकीवर त्यांनी प्रहार केले. सत्यनारायण करणे म्हणजे देवाची भक्ती नाही, हे विविध दाखल्यांसह सिद्ध करताना खरा देव हा दगड धोंड्यात नसून माणसातच आहे, हे ठणकावून सांगितले.
बहुजनांच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा अशिक्षितपणा, हे त्यांनी जाणले होते. आपल्या कीर्तनातून ते शिक्षणाचे महत्त्व ठासून सांगायचे.अशिक्षित माणसाला ' खटाऱ्याचा बैल' म्हणायचे. दिल्लीच्या तख्तावर भाषण देणारी माणसं आणि बोरीबंदरच्या स्टेशनवर पोती उचलणारी माणसं दोन्ही माणसंच, पण अशिक्षितपणामुळे त्यांची अशी फारकत झाली, हे ते मोठ्या कळवळ्याने सांगायचे. त्यासाठी बाबासाहेबांचे उदाहरण द्यायचे. देवाला नवस बोलून बोकड कापणाऱ्यांवर ते तुटून पडायचे. मोठा होईपर्यंत बोकडाला लेकरासारखे वागवून त्याला देवाच्या नावाने कापून खाणारे लोक त्यांना 'रानडुकरं' वाटायचे. गाडगेबाबांचे शब्द ऐकणाऱ्याच्या थेट हृदयात घुसायचे, काळजाला झोंबायचे.
No comments:
Post a Comment